अभियानात मनपा उर्दू शाळा क्र. ११, सेंट टेरेसा स्कूलने पटकावला प्रथम क्रमांक
जळगाव (प्रतिनिधी ) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या श्रेणीतून ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन जळगाव शहर मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ ने तर इतर व्यवस्थापनाच्या शाळा या श्रेणीमध्ये सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला . त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उर्दू शाळा क्रमांक ११ तर्फे मेमन जमातचे अध्यक्ष अब्दुल कादर कच्छी, सेक्रेटरी आसिफ मेमन, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आमच्या प्रयत्नांना यश आल्याचे बक्षीस विजेत्या मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ चे मुख्याध्यापक रिजवान शेख व सेंट टेरेसा स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलिएट यांनी सांगितले. या अभियानात जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०७, महानगर पालिकेच्या २३ तर ७८ खासगी शाळांनी सहभाग नोंदवला होता.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’च्या टप्पा एकचे जळगाव तालुकास्तरीय बक्षीस वितरण व समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कर्णयंत्र साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सेंट टेरेसा स्कूल येथे झाला. शिक्षकांनी अद्ययावत राहून डिजिटल झाले पाहिजे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ व शिक्षानिर्माण करून शाळेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी डायटचे प्राचार्य अनिल झोपे, गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलिल शेख, केंद्र प्रमुख सुशील पवार व इतर मान्यवर आदी उपस्थित होते.
या शाळांना मिळाले पारितोषिक..
स्पर्धेत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या श्रेणीतून प्रथम क्रमांक मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ (जळगाव), द्वितीय क्रमांक जि. प. प्राथमिक शाळा (सावखेडा खु), तृतीय क्रमांक जि. प. प्राथमिक शाळा (शिरसोली प्र. बो), इतर व्यवस्थापनाच्या शाळा श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल (जळगाव), द्वितीय क्रमांक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कुसुंबा खुर्द), तृतीय क्रमांक एस. एस. पी. डी. माध्यमिक विद्यालय (म्हसावद) ने प्राप्त केला.