जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित ‘आरोहण २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. क्रीडा स्पर्धांमधील चुरस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील कलाविष्काराने या महोत्सवात चैतन्य भरले होते.
मशाल प्रज्वलित करून महोत्सवाचा प्रारंभ..
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी मशाल प्रज्वलित करून आणि ‘आरोहण २०२६’ च्या प्रतीकात्मक फलकाचे अनावरण करून महोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले.
क्रीडांगण गाजवले ‘कुरुक्षेत्र’ने
स्नेहसंमेलनांतर्गत आयोजित ‘कुरुक्षेत्र’ या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपला क्रीडागुण दाखवला. ८ ते १० मे या कालावधीत कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल यांसारख्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या. मैदानावर खेळाडूंचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष ओसंडून वाहत होता.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
क्रीडा स्पर्धांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी विद्यार्थ्यांना मिळाली. यात प्रॉम नाईट, डी जे नाईट, गायन, वादन आणि नृत्य अशा विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव..
समारोप प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. प्रशांत सोळंके (अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. पंकज शर्मा (प्राचार्य, होमिओपॅथी), विशाखा गणवीर (प्राचार्य, नर्सिंग), डॉ. पियुष वाघ, डॉ. जयवंत नागुलकर (प्राचार्य, फिजिओथेरेपी) आणि डॉ. विजय बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.







