शहरातील ३७ हजार १५३ बहिणींना मिळणार लाभ
जळगाव : दि. १४ ऑगस्ट २०२४ : शहरात ३७ हजार १५३ बहिणींनालाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ३९ हजार १८७ अर्जामधून छाननीत १८५० अर्ज तात्पुरते रद्द झालेले असून या अर्जाच्याही त्रुटी दूर करून त्यांना लाभ मिळावा, अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.
आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी आलेल्या समितीची बैठक महापालिकेत झाली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. यात नोंदणी झालेले व छाननी झालेल्या अर्जाची माहिती मनपा प्रशासनाने ‘पीपीटी’द्वारे दिली. नारीशक्ती दूत मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन भरलेल्या अर्जाची संख्या व ऑफलाइन भरलेल्या अर्जाची संख्या अशी एकूण ३९ हजार १५५ इतकी आहे. छाननी झालेल्या अर्जाची संख्या ३९ हजार १८७ इतकी आहे. त्यापैकी १८५० अर्ज तात्पुरते रद्द करण्यात आलेले आहेत. एकूण ३७ हजार १५३ अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत.
आ. राजूमामा भोळे यांनी अर्जामधील त्रुटी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून त्रुटींमधील पूर्तता पूर्ण करून घेण्यात यावी. तसेच या लाभापासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना केल्या. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर त्रुटी दूर करून या बहिणींनाही लाभ मिळवून देण्याचे आश्वासन आ. भोळे यांनी दिले.