चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या एकूण तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले ईश्वर किसन डावर (वय १९, रा. आसरापानी ता. वरला), पवन आकाराम करते (वय १७) व पप्पू जयमाल डावर (वय १८, रा. कुंडिया ता. वरला) हे तिघेजण त्यांच्याजवळील (एम.पी. ४६, एम.व्ही. ०२९१) दुचाकी व (एम.एच. १९, बी.एक्स. १७६१) दुसऱ्या दुचाकीवरून जात होते.
त्यांना चुंचाळे- चोपडा रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रापुढे थांबवले असता त्यांच्या ताब्यात एकूण ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल, चार हजार रुपयांचे दोन काडतूस, दहा हजारांचे दोन मोबाइल असा १ लाख ६९ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोपडा शहर पोलिसांनी हस्तगत केला. हवालदार रवींद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे करीत आहेत.