सावदे प्र.चा गावातील घटना
एरंडोल (प्रतिनिधी ) एका तरुणाच्या डोक्यात अज्ञात मारेकऱ्यांनी दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावातील बस स्थानकात उघडकीस आला. दरम्यान सकाळी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. इंदल प्रकाश वाघ (वय २५) रा. जुनी भिलाटी असे मयत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, गावातील जुनी भिलाटी येथील रहिवासी इंदल प्रकाश वाघ (वय २५) हा दगड फोडून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करीत होता. दि.१० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास इंदल हा घरून बाहेर पडला होता. मध्यरात्री बस स्थानकानजीक रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान काही अनोळखी मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सावदा गावाचे पोलीस पाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी धरणगाव पोलीस निरीक्षक पंकज देसले, प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविला. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सीएमओ निरंजन देशमुख यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान तरुणाचा खून कोणी केला याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.