पॅरिस (वृत्तसंस्था ) | ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले.
क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत विनेशने काल अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण आज पुन्हा वजन केल्यानंतर तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेश फोगाट अपात्र ठरल्यावर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तिच्यासाठी ट्विट करत तिला मोलाचा संदेश दिला.
“विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत,” असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.