पारोळा | दि.०४ ऑगस्ट २०२४ | तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या बालकांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. तर दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले असल्याची घटना शनिवारी सायंकाळी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.
पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले शनिवारी भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) येथील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे या पाचही जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले. त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभी असलेले आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची आपबीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
दरम्यान बडा मोहल्यातील तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरतात मुलांचे नातेवाईक व मोहल्यातील नागरिकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे बाळू गीते, भोकरबारी पोलीस पाटील ज्योती ज्ञानेश्वर बिरारी, शहर तलाठी निशिकांत माने, पोलीस हिरालाल पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली.