भुसावळ (प्रतिनिधी) : जळगावातील अन्न व औषध प्रशासन विभागाने भुसावळ शहरातील श्रीकेश राजेश दुबे यांच्या मालकीच्या श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात मंगळवारी छापेमारी करीत ३५८ किलो सुटे खाद्यतेल जप्त केले. या तेलाची किंमत ३५ हजार ८५९ रुपये असून ते जप्त करीत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावल्याने शहरातील व्यापारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भुसावळातील बाजारपेठ भागात श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एम.पवार व ए. के. साळुंके यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. यावेळी पथकाने भेसळ असल्याच्या संशयावरून पामतेल व रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सहायक आयुक्त व्ही.पी.धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हि कारवाई नियमित हवी अशी मागणी नागरिकांची आहे. तर व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.