जळगाव, दि.०३ – महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांच्यासह १६ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जळगावचे रंगकर्मी योगेश शुक्ल यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने अध्यक्षपदी तर बीडमधील दीपा क्षीरसागर उपाध्यक्षपदी, चिल्ड्रन्स थिएटर अॅकॅडमीचे संचालक, नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार यांची कार्याध्यक्षपदी तर नगरचे सतीश लोटके यांची प्रमुख कार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून १७ जणांची बालरंगभूमी परिषदेची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यात जळगाव – धुळे – नंदुरबार विभागासाठी रंगकर्मी योगेश शुक्ल व नंदुरबारचे नागसेन पेंढारकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रमुख सल्लागार म्हणून पाच दशकांपासून बालरंगभूमीवर कार्य करणारे प्रकाश पारखी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.