जळगाव, दि.२९ – धर्मनगरी जळगावच्या पावन भूमीवर दि. २९ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत जैन सकल संघाच्या वतीने प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि जैन समाजाचे संस्थापक पद्मभूषण विभूषित पूज्य जैनाचार्य संत विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी या प्रवचन मालिकेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
२९ मार्च रोजी संत श्री जळगावात प्रवेश करतील आणि कुसुंबा येथील अहिंसातीर्थ गोशाळेतून पहाटे ५ वाजता प्रस्थान करुन ओंकारेश्वर मंदिराजवळील धर्मनाथ मंदिर येथे त्यांचे आगमन होईल. दि.२९ मार्च ते ३१ मार्च पर्यंत रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन, गणपती नगर येथे तीनही दिवस दररोज सकाळी ९ ते १० या दरम्यान त्यांचे प्रवचन होईल.
त्यानंतर ही प्रवचन मालिका दि.१२ ते २६ अप्रैल यादरम्यान दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत रेल्वे स्टेशनजवळील खान्देश सेंट्रल मैदानावर पूज्य श्री जैनाचार्य मुनींच्या श्रीमुखातून ‘रत्नप्रवाह’ चा झरा वाहेल. संत वचन श्रवणाचा लाभ घेऊन आपले जीवन आनंदी व सकारात्मक बनविण्यासाठी सर्व समाज व धर्मप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन सकल संघ समितीतर्फे करण्यात आले आहे.