जळगाव, दि.१३ – परिवर्तन आणि जिगीषा नाट्य संस्थेतर्फे परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाचे आयोजन जळगावात दि.१५, १६ व १७ मार्च २०२४ असे तीन दिवस करण्यात येत आहे. जिगीषा मराठवाड्यातील संभाजीनगर येथे ४० वर्षांपूर्वीची संस्था आहे. अशा संस्थेचा महोत्सव परिवर्तन जळगावतर्फे आयोजित करण्यात येत आहे. सतत नाविन्यपूर्ण निर्मिती करणारी परिवर्तन ही संस्था महाराष्ट्रात ओळखली जाते.
आपल्या नाट्यपरंपरेतील मैलाचा दगड ठरलेल्या “जिगीषा” या संस्थेच्या कलावंतांचा सन्मान करावा, त्यांच्याशी चर्चा व्हावी या उद्देशाने ‘परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ मार्च ला जिगिषा सन्मान या प्रदर्शनाने होणार आहे. भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरीत जिगीषाचा प्रवास अनुभवता येणार आहे. दिनांक १९ मार्च पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले सुरू राहणार आहे.
१५ मार्च शुक्रवार रोजी गणपती नगरातील रोटरी हॉल येथे ‘प्रवास जिगीषाचा, अनुभव आमचा’ या विषयावर चर्चा होणार आहे. यात ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते संदिप मेहता, अजय आंबेकर, हर्षल पाटील यांचा सहभाग असणार आहे. १६ मार्च ला वैभव मांगले, निर्मिती सावंत, संज्याछायाची टीम यांच्या सोबत ज्योती आंबेकर या संवाद करणार आहेत. तर १७ मार्च रोजी रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे व चारचौघीची टीम यांच्यासोबत संवाद होणार आहे.
‘प्रवास जिगीषाचा, अनुभव आमचा’ या विषयावर १५, १६ व १७ मार्च असे तीनही दिवस सायंकाळी पाच वाजता रोटरी हॉल गणपती नगर या ठिकाणी कलावंतांसोबत चर्चा आणि गप्पांची मैफल होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. रंगभूमीवरील दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. या उपक्रमाला रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व रोटरी क्लब गणपती नगर यांचे सहकार्य लाभले.
परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेत..
१६ मार्च रोजी ‘संज्याछाया’ हे नाटक तर १७ मार्च रोजी ‘चारचौघी’ नाटकांचे सादरीकरण छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रात्री आठ वाजता होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून अनेक रंगकर्मी जळगावात येणार आहेत. मराठी रंगभूमीच्या बदलत्या प्रवाहाविषयी आणि रंगभूमीवरील सद्यस्थिती विषयी एक व्यापक स्वरूपाची चर्चा यानिमित्ताने जळगावात होत आहे.
या महोत्सवाच्या आयोजनासाठी परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिल कांकरिया, अनिस शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमरभाई कुकरेजा, छबीराज राणे, नारायण बाविस्कर प्रयत्नशील आहेत. यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, सुदिप्ता सरकार, होरिलसिंग राजपूत, विनोद पाटील, प्रा.मनोज पाटील, मंगेश कुलकर्णी, सुनील बारी, राहुल निंबाळकर, प्रवीण पाटील, अंजली पाटील, नेहा पवार, अक्षय नेहे, लीना लेले हे परीश्रम घेत आहेत.