जळगाव, दि.१३- गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ४४ विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थ म्युझियमला तसेच जैन अॅग्री पार्क, जैन फूड पार्कला भेट दिली. जैन हिल्स परिसरातील पीस वॉक, पीस गेम्स तसेच महात्मा गांधीजींच्या विषयावरील विविध सत्रे कार्यशाळेत घेण्यात आलीत.
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ.गीता धर्मपाल यांनी गांधी समजून घेण्याची आवश्यकता व आजच्या काळातील त्यांची प्रासंगिकता सांगितली. वैभव सत्रे यांनी गांधी कथेवर आधारित पद्य सादर केले. सर्व विद्यार्थ्यांचा व साधन व्यक्तींचा परिचय करून घेण्यात आला. त्यानंतर म्युझिअमसह विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.
संध्याकाळी विविध खेळांद्वारे प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्गरम्य वातावरणात पीस वॉक करण्यात आले. त्यानंतर डॉ. गीता धर्मपाल यांनी ‘महात्मा गांधी : देशविदेशातील कार्य’ या विषयावर तर अध्यापक दीपक मिश्रा यांनी ‘महात्मा गांधींनी सांगितलेली सात पापे’ यावर सत्रे घेतली. भोजनोत्तर सत्रात गिरीश कुळकर्णी यांनी ‘स्व-मूल्यमापन व यश’ विषयावरील सत्रे घेतलीत. समारोप सत्रात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. विशेषतः गांधीतीर्थ येथील शांत व निसर्गरम्य वातावरण, काम करणाऱ्या व्यक्तींची शिस्त, चरखा या गोष्टी शिकावयास मिळाल्यात.
अनेकांनी समाज माध्यमातून आमच्यापर्यंत महात्मा गांधी बद्दलची चुकीची माहिती पोहोचली व तेव्हढीच माहिती आम्हाला होती. येथील म्युझियम पाहिल्यानंतर व कार्यशाळेतील विविध सत्रे ऐकल्यानंतर महात्मा गांधी व त्यांचे जीवनकार्य कळाले, असे सांगितले. शिवाजी विद्यापीठाच्या मोहसीन पठाण, वैभव जानकर, अवधूत गंगधर, रसिका कुलकर्णी व शिवाली पोवार यांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.