जळगाव, दि.२९ – भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी भव्य असे दालन साकारण्यात आलेले होते. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पर्यटन संचालनालयाचे महाराष्ट्र पर्यटन व व्यवसायाच्या संधी वाढविण्याचे तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक संपत्तीचा लाभ घेण्याचे उदिष्ट ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाच्या सहकार्याने बहिणाबाई महोत्सवात खान्देश व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खान्देशातील समृद्ध वारसा तसेच खान्देश पर्यटन व ऐतिहासिक स्थळे यांच्या माहितीचे चित्र प्रदर्शन दालन साकारण्यात आले होते.
खान्देशातील पर्यटन स्थळांचे अलौकिक सौंदर्य व सामाजिक समृद्धीचे दर्शन नागरिकांना या माध्यमातून घडले. सुमारे दहा हजार नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पर्यटकांनी या दालनाला भेटी दिल्या. पाच दिवसीय महोत्सवात खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार, शिरीष चौधरी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सुक्ष्म व लघू उद्योग संचालनालयाचे सहायक संचालक प्रफुल्ल उमरे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी आदी मान्यवरांनी या पर्यटन स्थळांच्या दालनाच्या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक करुन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.