अमळनेर, दि. २२ – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन महमंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व अशोक जैन यांच्या हस्ते होईल. प्रा.उषा तांबे ध्वजारोहण करतील. ग्रंथदालनाचे उद्घाटन पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर तर प्रकाशनकट्टा उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते होईल. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी कविसंमेलन पार पडेल. रात्री ८.३० वाजता छंद विठ्ठलाचा – भावसरगम हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.