जळगाव, दि.२४ – काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी शेकडो कार्यकार्त्यांसह आज बुधवारी भाजपात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उज्ज्वला बेंडाळे, रोहित निकम, नंदकुमार महाजन, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर देवेंद्र मराठे, शैलेश राणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला.
यावेळी बोलतांना आ. बावनमुळे म्हणाले की, रामलल्लांना काल्पनिक म्हणणाऱ्यांसोबत मी राहणार नाही, असं म्हणतं डॉ. उल्हास पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. उध्दव ठाकरेंनी डाॅ. उल्हास पाटील यांचा आदर्श घ्यावा, असं म्हणतं आ. बावनकुळे यांनी काँग्रेस व उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. डॉ. उल्हास पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील मोठे प्रस्थ आहे. तुम्ही भाजपात आले आहे. तुमचा सन्मान राखलाच जाईल. महिलांना भाजपात मोठा सन्मान आहे. असे म्हणतं केतकी पाटील यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याचे जाहीर केलं.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, डाॅ. केतकी पाटील यांच कौतूक करत उच्च शिक्षित असलेल्या केतकीताईं व डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रवेशामुळे आमची ताकद वाढली आहे. आता जिल्ह्यातील दोन्ही जागा ५ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आणू, असे ना. महाजन यांनी नमूद केले. गटबाजी, कटकारस्थान अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. मात्र भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. आता उल्हासदादा भाजपात आले आहे. येथे त्यांचा योग्य मान सन्मान राखला जाईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
पक्ष प्रवेशनंतर मनोगत व्यक्त करतांना डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे भारताला जगात वेगळी प्रतिमा मिळवून दिली. डॅयनॅमिक लिडर ज्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांच्यामुळेच भारताची जगात तिसरी मोठी अर्थसत्ता होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. अशा नरेंद्र मोदींसोबत जायचे नाही तर कोणाच्या सोबत जायचे? नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे. आमच्याकडे आमचे नेते भेटतही नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेस पक्षाला लगावला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांचे कौतूक करत धन्यवाद दिले. डॉ. केतकी पाटील यांनीही पक्षप्रवेशानंतर भाजपाचे आभार मानत येणाऱ्या काळात पक्ष बळकटीसाठी स्वत:ला झोकून देवू, असा शब्द दिला. भाजपामध्ये महिलांना योग्य न्याय दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संपूर्ण जगात भारताची ताकद वाढली आहे. त्यांच्या धोरणांप्रमाणेच आम्ही वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत वैद्यकीय सेवा पुरवित असल्याचे सांगितले.