जळगाव, दि.०८ – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांना हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार रविवारी संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हासदादा पवार तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर चे आमदार पी.एन.पाटील यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे मानकरी असलेल्या तिन्ही मान्यवरांना शाल, सन्मानपत्र, एक लाखाचा धनादेश, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्कारास उत्तर देताना अशोक जैन यांनी सांगितले की, आमच्या जैन इरिगेशन कंपनीला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋणी आहे आणि नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारून प्रस्तुत पुरस्कार आमच्या जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, आमचे परमपूज्य पिताजी श्रद्धेय भवरलालजी जैन आणि त्यांच्या समवेत परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण करत असल्याचे सांगितले. या पुरस्काराची एक लाख रक्कम न स्वीकारता त्यात जैन इरिगेशन सिस्टिम्स ली च्या वतीने दहा लाख असे एकूण ११ लाख रुपये बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देण्याचे अशोक जैन जाहीर केले.