जळगाव, दि.२७ – राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धा २०२३-२४ चे आज बुधवारी अनुभूती निवासी स्कुल येथे एका दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. यंदाच्या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यातून २०७ खेळाडू सहभागी झाले आहेत, त्यामध्ये १२६ मुलं तर ८१ मुली आहेत, स्पर्धेत ११० मुलं तर ७६ मुली या फिडे मानांकन प्राप्त खेळाडू आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिकच चुरशीची होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच बक्षिसांच्या व्यतिरिक्त जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड तर्फे तीन लाख रुपयांचे बक्षिसे देण्याची घोषणा जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या विद्यार्थी दशेतील काही किस्से सांगताना म्हटले की, आमच्यावेळी इतक्या सोयी सुविधा नव्हत्या मात्र आता बदलत्या काळानुसार तुम्हाला त्या प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा पुरेपूर फायदा घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा. अनुभूती स्कुलच्या निसर्गरम्य परिसराचे वातावरणाचे कौतुक करत त्यांनी सर्व खेळाडूंना या वातावरणाचा आनंद घ्या असाही सल्ला दिला व त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ७ वर्षाखालील वयोगट स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियनशीप विजेती नंदुरबार येथील साडे सहा वर्षीय नारायणी मराठे या खेळाडूचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन २४०७ रेटिंग असलेला आसामचा खेळाडू मयंक चक्रवर्ती व १९७० वी रेटिंग असलेली म्रीतिका मलिक पश्चिम बंगालची खेळाडू यांच्या हस्ते बुद्धिबळाची एक चाल खेळून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे अध्यक्ष व महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशन व जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असो. चे अध्यक्ष अतुल जैन, चीफ अरबीटर देवाशीष बरुआ (कोलकाता), महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे, नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सुभाष मोरवकर, चंद्रपूर जिल्हा असो. चे आश्विन मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे स्वागत जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे शकील देशपांडे, चंद्रशेखर देशमुख, नरेंद्र पाटील, तेजस तायडे, नंदलाल गादीया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभूती निवासी स्कुलचे विद्यार्थी आदित्य सिंह व आरव मिश्रा यांनी केले तर आभार आर. के पाटील यांनी मानले.