जळगाव, दि.२१ – नाशिक पोलीस परिक्षेत्र अंतर्गत विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धांना सोमवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर जल्लोषात सुरुवात झाली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली असून पाच जिल्ह्यातील खेळाडूंच्या विविध स्पर्धा खेळल्या जात आहेत.
पोलीस कवायत मैदानावर आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेला सोमवार दि.२० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून दि.२५ रोजी सायंकाळी स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस वेलफेअर शाखेचे रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, विलास शेंडे, रंगनाथ धारबळे, डॉ.विशाल जयस्वाल आदी उपस्थित होते.
सोमवारी पहिल्या सत्रात मैदानी क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावणे स्पर्धेत सूरज खडसे, राहुल मोरे, २०० मीटर धावणे स्पर्धेत समीर पठाण, इस्राईल खाटीक, जागृती काळे, प्रियंका टिकारे, १५०० मीटर धावणे स्पर्धेत विजय चांदा, मंजू खंडारे, ४०० मीटर धावणे स्पर्धेत विशाल सपकाळे, पवन चव्हाण, प्रियंका शिरसाठ, भाग्यश्री कांबळे, लांब उडी स्पर्धेत रशीद तडवी, निलेश राठोड आदी विजयी झाले.
फुटबॉल स्पर्धेत नाशिक शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण सामना अनिर्णीत राहिला. जळगाव विरुद्ध धुळे सामन्यात जळगाव संघाने ५-० ने बाजी मारली. कर्णधार मनोज सुरवाडे यांनी जोरदार प्रदर्शन करीत विजयी सलामी नोंदवली. नंदुरबार विरुद्ध अहमदनगर सामन्यात नंदुरबारने २-० ने बाजी मारली.
हॉकी सामन्यात जळगाव विरुद्ध अहमदनगर सामन्यात जळगाव संघ विजयी झाला. नाशिक शहर विरुद्ध धुळे सामन्यात नाशिक विजयी, नाशिक ग्रामीण विरुद्ध नंदुरबार सामन्यात नाशिक ग्रामीण संघ विजयी झाला. दुपारी दुसऱ्या सत्रात रंगलेल्या बॉक्सिंग सामन्यात अनेक सामने चुरशीचे झाले. मैदानावर खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल सामने देखील चांगलेच रंगतदार झाले.