जळगाव, दि.१६ – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदासाठी ५३२ पदांची सरळ सेवा भरती जाहीर केली असुन सदर भरती मध्ये समांतर आरक्षणाची तरतुद असताना त्याचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार करत समस्त वंजारी समाज सेवा संस्था, मेहरूण संचलित जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदासाठी सरळ सेवा भरती जाहीर केली आहे. त्यात एन.टी.डी. या संवर्गाला २% आरक्षण असुन त्यानुसार एन.टी.डी. साठी किमान १३ ते १५ जागांची तरतुद आवश्यक होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक एखाद्या समाजाला डावलण्याचे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
२०२१ मध्ये झालेल्या पी.एस.आय. भरती प्रकरणांतही असाच अनुभव समाजास आला होता. त्यावेळी आंदोलन केल्यानंतर ९ जागांची तरतुद करून मिळाली होती, तसेच २०२३ एम.पी.एस.सी. यात पी.डब्लु.डी. विभागात ३०५ जागांची जाहिरात असुन फक्त ३ पदे मंजुर होती. आरक्षणाची सरासरी पाहता ७ ते ८ जागांची तरतुद आवश्यक होती, परंतु या ठिकाणीही जाणीवपुर्वक भेदभाव केला असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून समाज बांधवांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा न्याय न मिळाल्यास आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशाराही देण्यात आला. यावेळी वंजारी युवा संघाने जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव वंजारी, सतीश चाटे, बाळू चाटे, संजय पाटील, सचिन ईखे, ललित चाटे, रोहन घुगे, वैभव वंजारी, रुषिकेश वाघ, मयुर नाईक, तेजस वाघ, भैय्या आंधळे, गौरव घुगे, वैभव वाघ, मोनिश नाईक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान संघटनेतर्फे माजीमंत्री पंकजा मुंडे, नामदार धनंजय मुंडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आमदार संतोष बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दादा भुसे यांना देखील मेल वरून निवेदन पाठविण्यात आले तसेच दूरध्वनी वर सकारात्मक संवाद झाल्याचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कळविले.