धरणगाव, दि.२२ – शहरासह परीसरात पहिल्या श्रावण सोमवारी सारजेश्वर महादेव मंदिर, भोले सरकार मित्र परिवारातर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या कावड यात्रेत हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावत सर्वत्र जय भोले सारजेश्वरचा नारा दुमदुमला. कावड यात्रेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही सहभाग घेतला.
या महाकावड यात्रेत शहर व जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी झाले. रविवारी रात्री सर्व भक्तगण एकत्र येवून ते सावखेडा येथील तापी नदीवर पोहचले. ब्रम्हमुहर्तावर सूर्यकन्या तापी मातेचे पूजन, सार्जेश्वर महादेव प्रती स्वरूप मुखोटा अभिषेक व पूजन, कलश व कावड पूजन करण्यात आले. तापी नदी येथून ढोल, ताशे, नगारे, डमरु वाद्यात भाविकांनी १५ किमी पायी चालत कावडींमधून तीर्थ आणले. सोमवारी सकाळी पावन पालखी कावड यात्रेने गावात प्रवेश केला.
यावेळी महिला वर्गाने डोक्यावर कलश घेवून भोलेनाथांची पालखी- कावड यात्रेचे स्वागत केले. तेथून बालाजी मंदिर, बाजारपेठ, कोट बाजार, परिवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक, पारोळा नाका मार्गे पालखी व कावड यात्रा राज राजेश्वर – सार्जेश्वर महादेव मंदिरात पोहचली. तेथे महारुद्र अभिषेक करण्यात आला. येथे भक्तांसाठी महाप्रसाद – भंडारा आयोजन राहुल रमेश वाघ यांनी केले होते. या उत्सवात सर्व जाती, धर्म आणि राजकीय पक्षातील नेते- कार्यकर्त्यांनी सहभाग घेवून एकीचे दर्शन घडविले.
शहरालगत नैसर्गिक वातावरणात असलेले प्राचीन सारजेश्र्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होते. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे सारजेश्वर महादेव मंदिराच्या समोरच भवानी मातेचे जागृत मंदिर आहे. धरणगावच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य स्वरुपात कावड यात्रा आयोजित करण्यात आली. जनतेने त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.