जळगाव, दि. १३ – विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असून विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हटकर समाज प्रगती मंडळ, धनगर समाज उन्नती मंडळ आणि सकल धनगर समाज मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. प्रसंगी मंचावर आ. लता सोनवणे, माजी आ. स्मिता वाघ, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, व्याख्याते प्रा. अशोक पवार, प्रा.उमेश काटे, तहसीलदार उमा ढेकळे, चारुलता ढेकळे, नियोजन विभागाचे राजेंद्र गीते, हटकर समाज प्रगती मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव ढेकळे, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्यामकांत वार्डीकर, मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे उपस्थित होते.
दहावी, बारावी आणि इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तहसीलदार झाल्याबद्दल उमा ढेकळे, देशसेवा करून परतलेले लक्ष्मण खांडेकर, मानसशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त प्रा. डॉ. अनिल सावळे यांचाही विशेष सत्कार झाला.
आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी कठोर श्रम करून उत्तीर्ण व्हावे. मातापित्यांचे आशीर्वादाने करिअर करावे. धनगर समाज हा स्वकर्तृत्वातून पुढे जात असून विविध क्षेत्रात नावलौकिक कमावित आहेत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन डी.ए. पाटील यांनी तर आभार प्रा. योगराज चिंचोले यांनी मानले.
हटकर समाज प्रगती मंडळाचे सचिव राहुल हटकर, धनगर समाज उन्नती मंडळाचे सचिव चंद्रशेखर सोनवणे, वसंत भालेराव, गौरव ढेकळे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.