जळगाव, दि.११ – महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष देशाच्या विकासासाठी किंवा राष्ट्रप्रथम या विचाराने एकत्र आलेले नाहीत, तर त्यांचा एकमेव हेतू केवळ सत्ता मिळविणे हाच आहे. त्यामुळे वज्रमूठ जाड झाली की सैल झाली याने कोणताही फरक पडत नाही, जनता सगळे ओळखून आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा संघटनात्मक प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणावरून टीका केली. ते सत्तेत व आम्ही विरोधी पक्षात असताना महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रयत्न करीत होतो. सरकारला योग्य सूचना देणे, सरकारला मदत करणे. आता केवळ सकाळी उठून टीका केली जाते.
एकनाथ खडसे हे भाजपात परत येण्याविषयी माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेले नाहीत. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांनी भाजपासाठी मोठे काम केले आहे असेही बावनकुळे म्हणाले.
कॉंग्रेसने मुस्लिमांत संभ्रम पसरविला..
कॉंग्रेसने केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या काळात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविले. भारतातील मुस्लिमांची स्थिती जगात सर्वांत चांगली आहे. भारतावर प्रेम करणारा मुस्लिम कधीच बाबर, अकबर, औरंगेजबाची जयंती साजरी करीत नाही. मुस्लिमांमध्ये संभ्रम पसरविण्यात काही राजकारणी कारणीभूत आहेत. मुस्लिम समाजाला शिक्षण, आरोग्य रोजगार हवा आहे. तो मिळावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.
शेवटी काळच उत्तर देईल !
उद्धव ठाकरे व शिवसेनेचे लोक माझ्या कुळाबद्दल बोलतात, माझे कुळ काढतात, माझ्या वर्णाबद्दल बोलतात, माझा चेहरा आफ्रीकन असल्याबद्दल बोलतात. आज उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांच्या खिजगतीतही नाही. याची उत्तरे शेवटी काळ- वेळ ठरवेल.