बुलढाणा, दि.११ – येथील बुलढाणा जिल्ह्य चेस सर्कल, बुलढाणा अर्बन तथा सहकार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात फिडे मानांकन राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही १४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान सहकार विद्या मंदिर सभागृह येथे घेण्यात येणार आहे. अशी माहिती बुलढाणा अर्बनचे सीएमडी तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. झंवर म्हणाले की, बुलढाण्यात होणारी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २०२३, ही स्पर्धा बुलढाणा व ग्रामीण परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा, प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर सहज जाता यावे, या उद्देशातून ठेवण्यात आलेली आहे.सदर स्पर्धा ही अंडर १७ गटासाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडूंची निवड होऊन दोन युवक व दोन युवती अशा खेळाडूंना या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ही ०१ जानेवारी २००६ च्या नंतरची असणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या समितीचे अध्यक्षपदी डॉ सुकेश झंवर, तर समितीच्या सचिव पदी अंकुश रक्ताडे (सहसचिव महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना) यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र व विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. सदर स्पर्धेकरिता एकूण बक्षीस रोख रक्कम ३६ हजार ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची सोय मोफत केली असून जेवणाची व्यवस्था आयोजकांनी नाममात्र शुल्कात केली आहे. तर खेळाडू सोबत येणाऱ्या पालकांना अतिशय माफक दरात राहण्याची जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक फेरी ही ६० मिनिट ३० सेकंद इनक्रीमेंट असणार आहे. सदरची स्पर्धा स्विस लिग पध्दतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १४ एप्रिल ला सकाळी दहा वाजता केले जाणार आहे तर बक्षीस वितरण १६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता केले जाणार आहे तसेच इतर महितीकरिता ९४०५७७७७८४ वर संपर्क साधावा. स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रँडमास्टर करणार मार्गदर्शन…
▪️बुलढाण्यात घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी मार्गदर्शन व मुख्य आकर्षण म्हणून ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे हे असणार आहे. तर या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सल्लागार अशोक जैन तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे.