जळगाव,दि.०६ – जिल्ह्यात काम करीत असताना विवेकी विचारांच्या बळकटीकरणसाठी कार्यकर्त्यांनी क्रियाशील असणे महत्त्वाचे आहे. ३३ वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेकी विचार रुजण्यासाठी शाखा पातळीवर मजबूतिकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष व प्रधान सचिवांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची २०२१-२२ कार्यकारिणीची अखेरची जळगाव जिल्हा बैठक पाचोरा येथील झेरवाल अकादमी येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, तीन जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, सुनील वाघमोडे व विश्वजीत चौधरी उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यकर्त्यांचा परिचय झाल्यानंतर शाखांनी आपले अहवाल सादर केले. त्यानंतर नवीन निवड झालेल्या जिल्ह्यातील २१ शाखा कार्यकारिणींचे अभिनंदन करण्यात आले. नवीन निवड झालेल्या कार्याध्यक्ष व प्रधान सचिवांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. आगामी काळात राष्ट्रीय विज्ञान दिन, देहदान जनजागृती कार्यक्रम, पर्यावरणपूरक होळी आदी उपक्रम जिल्हाभरात राबविले जाणार आहेत. त्याबाबतचे प्राथमिक नियोजन शाखांनी सांगितले.
यावेळी मागील चार महिन्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. चळवळीची विवेकी विचारसरणी असलेली परंपरा कायम रुजवायची असेल तर शाखांनी क्रियाशील असणे महत्त्वाचे आहे असे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी सांगितले.
पनवेल येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आलेले विविध निर्णय याविषयी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी माहिती सांगितली. जिल्ह्यातील बुवाबाजीच्या प्रकरणांचा आढावा जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी घेतला.
जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांनी कार्यकर्त्यांच्या चमत्कार सादरीकरणविषयी आढावा घेऊन त्याविषयी सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध शाखांचे कार्याध्यक्ष व प्रधान सचिव तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हा बैठक यशस्वी होण्यासाठी जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर कोतकर, पाचोरा शाखेचे अध्यक्ष वैशाली बोरकर, कार्याध्यक्ष अमोल झेरवाल, प्रधान सचिव अँड. स्वप्निल पाटील, विवेकानंद पाटील आदींनी परिश्रम घेतले.