जळगाव, दि.१३ – ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे तितकीचे महत्त्वाची कला आहे. आर्टिस्ट होणं किंवा होऊ देणं हे महत्त्वाचे असून कला, साहित्य, चित्रकला शिल्पकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपण समृद्ध होऊया समाजाला उत्क्रांत अवस्थेत नेण्याची क्षमता केवळ कलांमध्ये असते असे प्रतिपादन ज्ञानपीठकार डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी केले.
जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना.धों.महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते सन्मानपूर्ण प्रदान केला गेला.
कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. याप्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर, संघपती दलिचंद जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सौ.निशा जैन, डाॅ. भावना जैन व सन्मानार्थी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बहिणाई पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी पुस्तकाचे संपादक अशोक चौधरी, संपादन सहाय्यक ज्ञानेश्वर शेंडे, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थीत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बि.जी. शेखर पाटील यांचीही उपस्थीती होती. यावेळी चौघेही पुरस्कार्थींची कार्य परिचयात्मक डॉक्युमेन्ट्री दाखविण्यात आली.
प्रास्ताविक ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. यात त्यांनी श्रध्देय भवरलालजी जैन हे कला, साहित्य आणि संस्कृती ही विश्वाची किल्ली मानत असे सांगितले. जळगाव हे कवितेचे गाव असून नामांकित कविंची मोठी परंपरा या गावाला असल्याचे ते म्हणाले.
साहित्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मनोगत…
स्त्रीवादाची पाळंमुळं भारतीय साहित्यात – संध्या नरे-पवार
श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारने सन्मानीत श्रीमती संध्या नरे-पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्त्रीवादी विचारांची जेव्हा ओळख झाली तेव्हा अभ्यास केला असता त्यामध्ये संत मुक्ताई, संत जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यात विज्ञानवादी दृष्टी दिसली. सर्वांच्या साहित्यात भारतीय स्त्रीवादाची पाळेमुळे मातीत रूजली आहेत. ज्या नावाने हा पुरस्कार त्या बहिणाईंच्या साहित्यात महिलांच्या अडचणींसह कणखर पणा दिसतो. मातीत पांडुरंग पाहणाऱ्या कृतीशील विचारांची रूजवात जैन हिल्स परिसरात असल्याचेही त्या म्हणाल्या.
कवितेने ओळख दिली – वर्जेश सोलंकी
कविता ही माणसाला ओळख करून देतात यासाठी अभिव्यक्त झाले पाहिजे. श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्काराने सन्मानीत केल्याने श्री. वर्जेश सोलंकी यांनी आयोजकांचे आभार मानत 1990 हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याच वर्षापासून मी कविता लिहायला लागलो याचा आनंद व्यक्त करून स्वरचित कविता सादर केली.
साहित्यातुन दुभंगलेली मने जोडली जातात – प्रविण बांदेकर
सध्याच्या वातावरणात आपापसातील द्वेषाची, तिरस्काराची भावना वाढीला लागत असताना समाजातील दुभंगलेली मने साहित्यातुन जोडले जातात. साहित्य, संस्कृती, कला यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणा-या भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कौतुकाची, उमेदाची थाप पुरस्काराच्या रूपाने दिल्याचे त्यांनी सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रातून स्वतःला व्यक्त करा – प्रभाकर कोलते
चित्रकलेतुन परमेश्वराचे रूप पाहता येते. चित्र ही बोलत नाही ती मनाने पाहायची, अनुभवयाची असतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता चित्र काढत राहिलो यातुनच आयुष्याला जीवंतपणा आला. एखादा विषय घेऊन काम करू नये त्याची नक्कल करू नका त्याचा विचार करा आणि ते चित्रातुन व्यक्त करा. त्यांचे गुरू पळशीकर सरांचा उल्लेख करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत न करता काय करावे ह्याचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.