पुणे, दि.१५ – परिवर्तनही सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचे काम करतेय. परिवर्तन कला महोत्सव पुण्यात होतोय हे सांस्कृतिकदृष्ट्या मला महत्वाचे वाटते. जळगाव हे सोन्यासाठी प्रसिध्द असलेलं गाव पण परिवर्तनमुळे कलेच गाव अशी ओळख झालेली आहे. इतकं परिवर्तन महत्वाचं वाटतं असं मत सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी पुण्यातील परिवर्तन कला महोत्सवाच्या उद्घाट प्रसंगी व्यक्त केलं.
याप्रसंगी फुटाणे यांच्या कविता वाचनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी काटेरी चेंडू ही कविता सादर केली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश पायगुडे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मोकाशी, गायिका सुदिप्ता सरकार उपस्थीत होते.
उद्घाटनानंतर ‘गजल – रेगिस्थान से हिंदुस्थान तक’ कार्यक्रम परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केला. गझल या प्रकाराचा इतिहास निवेदनात शंभू पाटील यांनी मांडतांना गझलेला पर्शिया, अरेबिया इथे सुरुवात झाली असून सुफी संतांनी गजल भारतात आणली. भारताच्या सांस्कृतिक भूमीत गझल रुजली, बहरली, फुलली आणि भारताच्या जीवनाचा अविभाज्य अंग गजल बनली. उर्दू या भारतीय भाषेत गझल भारतीयांच्या मनामनात गेली. अमीर खुसरो यांच्या पासून सुरु झालेला हा प्रवास गालिब यांच्यामुळे सर्वांग सुंदर झाला आणि गझल हा केवळ काव्यप्रकार उरला नाही तर गझल म्हणजे भारतीय जगण्याचं दर्शन झालं आहे. गझल हा प्रकार मराठीसाठी नवखा नसला तरी मराठी गझल अजूनही आपली वाट शोधते आहे. ८०० वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा काव्यप्रकार समजून घेण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी, त्याचे बारकावे, सौन्दरे समजूनघेण्यासाठी परिवर्तनने “गझल रेगिस्तान से हिंदुस्थान तक” या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे मांडले.
कार्यक्रमात अक्षय गजभिये यांनी ‘समजावूनी व्यथेला’, ‘चुप के चुप के’ हंगामा है, तर श्रद्धा कुलकर्णी यांनी ‘केव्हा तरी पहाटे’, ‘पत्ता पत्ता बुटा’, ‘छाप तिलक’ अशा काही गजला सादर केल्यात. हर्षदा कोल्हटकर विविध शेर सादर केले. भुषण गुरव व श्रीपाद शिवलकर यांनी तबल्यावर साथसंगत केली. बुद्धभूषण मोरे यांनी तालवाद्य वाजवून संगत केली. दिलीप पांढरपट्टे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी यांचे होते. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रसिकानी उत्तम प्रतिसाद दिला.