जळगाव, दि.०२ – महात्मा गांधीजींच्या विचारांना काळाच्या मर्यादा नाहीत कारण गांधीजींच्या ठाई मानवता समता आणि नैतिकता आहे. त्यांचे विचार आणि कार्य सर्वकालीन असून ते जगाला कायम प्रेरणा देत राहतील असे विचार सुप्रसिद्ध गांधी विचारवंत, माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास दादा पवार यांनी परिवर्तनच्या संवाद व्याख्यान मालिकेत केले.
संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने ‘गांधींचे समकालीनत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पवार म्हणाले की महात्मा गांधी हे फक्त समकालीन नसून ते सर्वकालीन आहेत. गांधीजींच्या विचारांना काळाच्या मर्यादा नाहीत त्यांच्या विचारांची आवश्यकता ही कायम मार्गदर्शक स्वरूपात दिसून येते. आपण जर ऐतिहासिक मागोवा घेतला तर त्यातल्या अस्वस्थतेच्या अवस्थेतही गांधींचे विचार हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून समोर येतात. यावेळी उल्हास पवार यांचा राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा हे आत्मचरित्रपर पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
उल्हास दादा पुढे म्हणाले, अलीकडच्या काळाला गांधी अद्यापही कळलेले दिसून येत नाहीत. गांधींचे विचार हे फक्त विचार नव्हते तर ते एक आचरण होते. जगात भारताची ओळख ही महात्मा गांधी मुळेच असून जगातल्या सुमारे ७२ देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे अस्तित्वात आहेत तर १४२ देशांमध्ये महात्मा गांधींची पोस्टाची तिकिटे आजही वापरली जातात. यातूनच गांधीजींची भारताबाहेर असलेली लोकप्रियता त्यांनी कथन केली.
भारतीय तत्त्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आपल्या पूर्वजांनी विश्वाशिवाय विचार केला नाही आता विश्वात्मके देवे, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर ही याची जिवंत उदाहरण आहे. आणि या उदाहरणातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे महात्मा गांधी. आज महात्मा गांधीं हे जगभरात लोकप्रिय आहेत अगदी नेल्सन मंडेलांनी सुटल्यावर देखील गांधीजींचा च नाव घेतलं होतं तर अलीकडच्या काळात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांनी देखील महात्मा गांधीजींचे नाव घेतलं. वर्ण भेदातील ही दोन महान उदाहरण जेव्हा गांधीजींच्या नावाचा उल्लेख करतात त्यावेळी त्यांचे वर्णभेदातील कार्य सहज निदर्शनात येते.
दरम्यान उल्हास दादा पवार यांनी महात्मा गांधी यांच्या काही वास्तववादी अनुभव सांगितले. यावेळी शत्रू आणि विरोधकांमधले अंतर गांधीजींनी कशाप्रकारे असते ते समजावून सांगितले. गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी देशातल्या दिन दुबळ्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून करून दिलेली ओळख आणि त्यातून गांधीजींच्या दिसणाऱ्या वैचारिक प्रगल्भतेचा अनुभव कथन केला.
यावेळी कार्यक्रमाला शिरीष बर्वे, नंदलाल गादिया, उद्योजक किरण बच्छाव, चित्रकार राजू बाविस्कर, विनोद पाटील, होरीलसिंग राजपूत, शंभू पाटील, हर्षल पाटील, अंजली पाटील, शरद पाटील, उदय सपकाळे, वर्षा चोरडिया, नेहा पवार, सुष्मिता भालेराव, बुद्धभूषण मोरे, हर्षदा कोल्हटकर, हर्षल पाटील, अविनाश तायडे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.