जळगाव, दि.०६ – शहरातील महाराणा प्रताप चौक मित्र मंडळाच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांची विशेष उपस्थित होती.
आम्ही पूर्णपणे निर्दोष असताना केवळ हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली तर आम्हाला मागील उद्धव ठाकरे सरकारने तुरुंगात टाकले. शेवटी जनतेचा रोष त्यांना लागला उद्धव ठाकरे यांना त्याची शिक्षा मिळाली, अशी जोरदार टीका करत, आज त्यांची सत्ता जाऊन शिंदे- फडणवीस हे चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यासाठी तसेच हनुमान चालीसा पठण करण्यासाठी खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे जळगावात संध्याकाळी आले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात शिंदे-फडणवीस हे अतिशय चांगले सरकार अस्तित्वात आले आहेत. त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. बेरोजगार तरुण, शेतकरी यांचे प्रश्न सुटले पाहिजे अशी आमची या सरकारकडून अपेक्षा आहे. ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे सातत्याने निवडून येत आहेत त्यांना कायमचा फुल स्टॉप लागून त्यांचा पराभव होईल अशी ही माहिती त्यांनी दिली.
तसेच महाराष्ट्रामध्ये आता यापुढे लव जिहाद मुद्दा उचलून धरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या ठिकाणी महिलांना व मुलींना फसवले गेले असेल, त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मदतीला आम्ही उभे राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार रवी राणा, महाराणा प्रताप मित्र मंडळाचे अध्यक्ष कल्पेश सोनवणे, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर भारती सोनवणे, सीमाताई भोळे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.