लालसिंग पाटील | भडगाव, दि.०६ – तालुक्यातील कजगाव येथील रहिवासी व लष्करातील जवानाने आपल्या मुलीचा वाढदिवस दिव्यांग बालकांसबोत अनोख्या पद्धतीने साजरा करून एक नवीन आदर्श ठेवला. दरम्यान त्यांच्या या कृत्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
सैनिक हे वर्षभरातून फार तर दोन ते तीन वेळेस सेवेतून रजा घेऊन आपल्या गावी येत असतात. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस आपल्या मुलाबाळांना वेळ देणे शक्य होत नाही. त्यांना नेहमी आपल्या आई, वडील पत्नी मुलांपासून व परिवार पासून दूर राहावे लागते. त्यामुळे सुट्टी वर आल्यावर ते शक्य तेवढा वेळ कुटुंबासाठी देण्याचा प्रयत्न करीत असतात.
दरम्यान कजगाव येथील तरुण व भारतीय लष्करातील जवान हर्षदीप संजय महाजन यांनी आपली मुलगी हर्षिता हिच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग बालकांशी हितगुज करून व त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करून त्यांना मायेचा व कुटुंबाचा आधार देण्याचा प्रयत्न केला.
दिव्यांग बालकांना त्यांच्या आवडीचे भोजन देऊन त्यांचा सन्मान केला. समाजाने त्यांना दुबळे न समजता त्यांना आपल्यातीलच एक समजून त्यांना आधार द्यावा, असा त्यामागील हेतू आल्याचे जवान हर्षदीप महाजन यांनी सांगितले.
यावेळी चाळीसगाव अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा मेश्राम, संजय महाजन, हर्षदीप महाजन, एकनाथ महाजन, मयूर महाजन, मथुराबाई महाजन, आशाबाई महाजन, अलका महाजन, निकीता महाजन, शुभांगी महाजन, वैष्णवी महाजन, साईराज महाजन, अंधशाळेचे कर्मचारी उपस्थित होते.