जळगाव, दि.१४ – जिल्ह्यात गिरणा नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे.
तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो. तरी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन, जळगाव व कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.