जळगाव दि.१२ – विठ्ठल रूखमाईंच्या वेशभूषमधील चिमुकल्यांची दिंडी, रिंगण सोहळा, पाऊली, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘माझा देव पंढरी…’,’सुंदर ते ध्यान’.. या भक्ती गितांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना करण्यात आली. ‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची अनुभूती जळगावात झाली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे रविवारी कांताई सभागृह येथे ‘बोलवा विठ्ठल’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, सी.ए. विवेक काटदरे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे प्रसाद भट, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा, प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.
‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, गोदावरी संगीत महाविद्यालय, शानबाग स्कूल, पलोड शाळा, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक दीपिका चांदोरकर यांनी केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. तेजल भट यांनी सूत्रसंचालन केले.
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी, रिंगण व खेळ सादर केले. डॉ.अपर्णा भट यांच्या प्रभाकर संगीत कला तर्फे नृत्याची प्रस्तुती करण्यात आली. यावेळी ‘गजर, घनू वाजे, कानडा राजा पंढरीचा, अनुभूती गणे, कोण्या गावी हो, माझा देव पंढरी, संतांची या गावी, खेळ मांडियेला, वेढा वेढा रे पंढरी, सुंदर ते ध्यान, चल ग सखे, रखुमाई रखुमाई अनुभूती, धाव घाली आई, विष्णू मय जग, अवघा रंग एक झाला, चंद्रभागेच्या तीरी, अवघे गरजे पंढरपूर’ अशी एकाहूनएक सरस भक्तीगितांची मैफल रंगली. भक्तिगीतांच्या मैफिलीतून साक्षात पंढरपूर अनुभूती रसिकांना झाली. तबला संगत प्रसन्न भुरे, सोहम कुलकर्णी तर हार्मोनियम साथ शौनक दीक्षित याने केली.