जळगाव, दि.१९ – शहरामधील जुन्या अपार्टमेंट धारकांना एक नळ कनेक्शन द्यावे या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत रविवारी पद्मालय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या वेळी शहरातील वीस अपार्टमेंट धारक उपस्थित होते. अपार्टमेंटच्या नळ कनेक्शन प्रश्नांबाबत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून दि.२२ जुन रोजी महापालिका ईमारती समोर नळ-तोटी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जळगाव शहरामध्ये अमृत योजनेद्वारा मुबलक पाणी मिळणार असल्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली होती मात्र आत्तापर्यंत जुन्या अपार्टमेंट धारकांना नळ कनेक्शन मिळालेले नाही. जुने अपार्टमेंट धारकांना एकच कनेक्शन देण्यात येईल असे पालिका प्रशासन सांगत आहे. या महापालिकेच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरातील जुन्या अपार्टमेंट धारकांची बैठक आज रोजी पद्मालय विश्रामगृह येथे संपन्न झाली.
महापालिका प्रशासनाला जागे करण्याकरता व जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नळ-तोटी आंदोलन करण्यात येईल असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एड. जमील देशपांडे, विनोद शिंदे, आशिष सपकाळे, योगेश पाटील, संदीप पाटील, संदीप मांडुळे, महेश माळी, ललित शर्मा, अविनाश जोशी, सागर पाटील, साजन पाटील, विकास पाथरे उपस्थित होते.