जळगाव, दि.३० – परिवर्तन पुस्तक भिशी सारख्या उपक्रमांनी हरवत चाललेला वाचक पुन्हा पुस्तकांकडे वळू शकतो, नवे वाचणारे घर, कुटुंब निर्माण होऊ शकते. यातूनच वाचक घडतील असे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी परिवर्तन पुस्तक भिशीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना त्यांनी परिवर्तनने सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच अत्यंत चांगला आहे. वाचनाची चळवळ रुजवण्यासाठी हे सुरू आहे हे मला महत्त्वाचे वाटते. बंद पडणाऱ्या मराठी शाळा पुन्हा सूरू झाल्या पाहिजेत. मातृभाषेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. पुस्तक निर्मितीच्या, वितरणाच्या क्षेत्रासाठी शासनाने मदतीचा हात दिल्याशिवाय पुस्तकांच्या किंमती कमी होणार नाहीत.
गावागावात चांगली ग्रंथालये, पुस्तकांची दुकाने आता उपलब्ध नाहीत त्यामुळे पुस्तकं नेमकी कुठे आणि कशी घ्यावी हा प्रश्नच आहे, त्यामुळे हरवत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व समृध्द होण्यासाठी परिवर्तन पुस्तक भिशीतून नक्कीच वाचन चळवळ रुजण्यास मदत होईल. संविधानात आपले अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत पण त्याची साधी एक प्रत सुद्धा आपल्या घरात असू नये यासारखं वैषम्य दुसरं नाही.
आज जवळपास ४० टक्के वाचक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तक वाचतो तर मला वाटतं १६ टक्के लोक तणाव मुक्तीसाठी पुस्तक वाचत असतात हा सर्वे सांगतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिशी प्रमुख मंजुषा भिडे यांनी केले. अपूर्वा पाटील, रंजना खैरनार, प्रा. गायत्री लेले, कीर्ती देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शंभू पाटील यांनीही जोशी यांच्याशी संवाद साधाला. प्रा मनोज पाटील यांनी परिचय करून दिला तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.