पुणे, दि. २३ – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखालील तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ठाणे) या संघटनेतील ९ पैकी ६ पदाधिकारी यांनी राजीनामे दिले असून एकाधिकारशाही विरुद्ध राज्यातील जवळपास २८ जिल्ह्यांनी अविश्वास दाखवत अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप ओंबासे महासचिव असलेल्या कार्यकारी मंडळाने अल्पमतात आल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचे सर्व अधिकार त्यांनी गमावले आहेत. तरीही महाराष्ट्रातील नवख्या लोकांना नियम बाह्य पद्धतीने खोटी माहिती व स्वप्न दाखवून प्रत्येक जिल्ह्यात वाद निर्माण करण्याचे, नवीन जिल्हा संघटना स्थापन करून सुडाचे राजकारण सुरू केले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली आहे.
देशभर तायक्वांदो खेळात होत असलेल्या घडामोडी, खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा फायदा मिळवून देण्यात असोसिएशनला अपयश आल्यामुळे तसेच सर्व अधिकृत जिल्हा संघटना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एकहाती कारभारामुळे नाराज होऊन कार्यकारी मंडळातील ९ पैकी ६ पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याने कार्यकारी मंडळाला आता कुठलेही अधिकार राहिलेले नसतानाही नवीन लोकांची दिशाभूल करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन लोकांना उभे करून मूळ तायक्वांदो खेळाडू असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांवर अन्याय करण्याचे काम सुरू केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे (टी.एफ.आय.) २०१६ साली झालेल्या निवडणुकीच्या मतदार यादीनुसार २ महीन्यात निवडणुक घेण्याचा आदेश २८ एप्रिल २०२२ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दिले आहेत. तरी महाराष्ट्र राज्यातील अधिकार गमावलेल्या घटना बाह्य संस्थेच्या भूलथापांना लोकांनी बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यां व त्यांना साथ देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मिलिंद पठारे यांनी केले आहे.