भडगाव, दि.०५ – तालुक्यातील कजगाव येथील सरकारी जमिनीवर बेकायदा खोदकाम करण्यात आले असून महसूल प्रशासन दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता भुषण पाटील यांनी बुधवार पासून भडगाव तहसील आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत माहिती अशी की, कजगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट क्रमांक ३०५ या सरकारी जमिनीत बेकायदा खोदकाम करून हजारो ब्रास दगड, मुरूम, गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याची तक्रार भुषण पाटील यांनी तहसीलदार यांच्या कडे केली होती. दरम्यान दि. १५/०३/२०२२ रोजी नायब तहसीलदार यांनी एस.डी. मोतीराय यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र दिड महिना उलटून ही कोणतीच चौकशी झाली नाही. यामुळे महसूल प्रशासन या बेकायदा खोदकाम प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भूषण पाटील यांनी केला आहे.
तहसील आवारात आमरण उपोषण..
बेकायदा खोदकाम प्रकरणी महसूल प्रशासन ठोस कारवाई करीत नाही म्हणून आमरण उपोषणाचा इशारा पाटील यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून येथील तहसील आवारात भूषण पाटील यांनी दि.४ बुधवार पासून आमरण उपोषणाला सुरूवात केले आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नसून उपोषण स्थळी कोणत्याही अधिकार्यांनी भेट दिली नाही. यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन सामाजिक कार्यकर्ता भुषण पाटील यांना पाठींबा दिलायं.