जळगाव, दि.१६ – विद्यार्थ्यांचे कलागुण अधिक प्रगल्भतेने समोर यावे व त्यांच्या कौशल्याला चांगले व्यासपीठ लाभावे, या हेतूने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच उल्हास-२०२२ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत वारके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुमार, तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा.दिपक झांबरे, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.विजयकुमार वानखेडे, प्रा.ईश्वर जाधव, स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. प्रशांत शिंपी, तसेच सर्व शाखांचे प्रमुख व महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. महाविद्यालयात झालेल्या घडामोडी व वेगवेगळ्या स्तरावर झालेली प्रगती याबद्दल सांगतांना त्यांनी ट्रेनिंग अँड प्लेप्लेसमेंट विभागाचे कौतुक केले. अधिक संख्येने विद्यार्थांचे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे पुढील वर्षाचा आराखडा सांगताना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्लेसमेंट या मुद्यावर भर दिला. कार्यक्रमामध्ये कलागुण सादर करणाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मॅनेजमेंट स्कीलबद्दल विस्तृत माहिती दिली. मनोरंजक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा मुद्दा पटवून दिला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर निर्णय क्षमता व व्यवस्थापन यांची सांगड महत्त्वाची असते, असे त्यांनी नमूद केले . तुमचे मार्ग तुम्हालाच शोधायचे आहे. पण काही सोप्या गोष्टीचं आचरण केलं आणि निरर्थक गोष्टी टाळल्यास विचारांमध्ये प्रगल्भता येते. आत्मविश्वास वाढतो, चिकाटी वाढते. प्राधान्यक्रम ठरवा व नियोजन करा. डॉ. प्रशांत वारके यांनी समर्पक शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण, नृत्याविष्कार तसेच गायन असे विविध प्रयोग मंचावर सादर करण्यात आले. वेगवेगळ्या थीम व शैलीवर विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सोलो व गुप मध्ये नृत्यांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी भरघोस व उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना, तसेच शैक्षणिक वर्षात उत्तम कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमला पोखरेल, कोणिका पाटील, नम्रता संगेले व प्रशांत पाटील यांनी केले.
स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला सकाळी पारंपारीक वेशभूषा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूूषा करुन व्यासपीठावर सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी प्रा. शुभांगी तायडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शेला पागोटे (फिश पाँड) हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप धमाल केली. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह कमालीचा जाणवला. कार्यमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किशोर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.