जळगाव, दि.२२- कृषी वीजबिल तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी खान्देशात ठिकठिकाणी आयोजित कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत महावितरणतर्फे शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीची साद घातली जात आहे. आतापर्यंत झालेल्या १८७ मेळाव्यांत प्राप्त तक्रारी निकाली काढल्याने शेतकऱ्यांनीही वीजबिल भरण्यास दिलेला प्रतिसाद कायम आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून मिळणाऱ्या निर्लेखन सवलतीमुळे वीज बिलाच्या थकबाकीचा बोजा कमी झाला आहे. यानंतरही जी सुधारित थकबाकी उरली आहे, त्यातील ५० टक्के रकमेचा भरणा ३२ मार्च २०२२ पर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. त्यामुळे लाखो शेतकरी वीजबिल भरण्यास पुढे आले आहेत.
ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्या निर्देशानुसार वीजबिलासह शेतकऱ्यांच्या सर्व वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक १० ते ३१ मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तात्काळ कळविण्यात येत आहे.
महावितरणच्या वतीने खान्देशात आतापर्यंत १८७ कृषी वीज ग्राहक मेळावे झाले. त्यात वीजबिलांच्या ५५९ व इतर ६ अशा ५६५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यात १२९ मेळाव्यांत ३११, नंदुरबार जिल्ह्यात ३० मेळाव्यांत १५५ तर धुळे जिल्ह्यात २८ मेळाव्यांत ९९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. जागेवरच तातडीने तक्रार निवारण झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, वीजबिल भरण्याकडे त्यांचा ओढा कायम आहे. मेळाव्यांत उत्स्फूर्तपणे शेतकरी बिल भरत आहेत.
दरम्यान, कृषी वीजबिलांच्या सुधारित थकबाकीत ५० टक्के सवलत मिळवण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे सर्व कृषी ग्राहकांनी त्यापूर्वी आपले बिल भरून थकबाकीमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.