जळगाव, दि.१६ – खान्देशातील प्रसिद्ध चित्रकार विकास मलारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचं गोल्ड मेडल नुकतच जाहिर झाले व प्रदानही करण्यात आले. अतिशय मानाचं व प्रतिष्ठेचं समजल्या जाणारं हे गोल्ड मेडल मिळणारे ते आपल्या खान्देशातील पहिलेच व एकमेव चित्रकार आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचा सत्कार जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आला. परिवर्तनच्या चित्र साक्षरता अभियानात विकास मलारा यांनी वेळोवेळी अनोखी मांडणी केली असून चित्र समजून घेणे, समजावून सांगण्यासाठी चित्र साक्षरता उपक्रम राबविला होता.
त्यांना चित्रसाक्षरता व चित्रप्रदर्शनांमधून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी नमुद केले. परिवर्तनच्या कलात्मक वातावरणचा फायदा चित्रकलेच्या वृद्धीसाठी व सकस निर्मितीसाठी होत असून मोठेभाऊ श्रद्धेय भवरलाल जैन व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा पांठिबा व मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले असल्याची भूमिका विकास मलारा यांनी सत्काराप्रसंगी मांडली.
सत्काराप्रसंगी बोलतांना अशोक जैन म्हणाले की विकास मलारा यांनी खान्देश मधील चित्रकलेला ओळख निर्माण करून दिली असून परिवर्तन सातत्याने चित्रकलेसाठी विविध उपक्रम राबवत असून त्यातून चित्रकारांची पिढी घडते आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी परिवर्तनचे अध्यक्ष रंगकर्मी शंभू पाटील, चित्रकार नितीन सोनवणे, विजय जैन आदी उपस्थित होते.