जळगाव, दि.१५ – अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार परवानाधारक महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा नाशिक विभागीय मेळावा सोमवारी जळगावात संपन्न झाला. याप्रसंगी महासंघाकडून जमनादास भाटिया यांची नाशिक विभागीय संघटक पदी निवड करण्यात आली. दरम्यान रेशन दुकानदारांना ई पाॅस मशीन चालवताना ज्या अडचणी येतात, त्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. मशिनी दुरुस्त न केल्यास राज्यभरातील मशीने तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील असा इशारा देण्यात आला.
रेशन दुकानदारांनी आपल्या अडचणी मांडल्यानंतर तुमचा प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन देऊन योग्य न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटिया यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी महासंघाचे राज्याध्यक्ष डि.एन.पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुळकर्णी, तहसिलदार नामदेवराव पाटील, संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी मेळाव्यासाठी हजेरी लावली.
VIDEO