जळगाव, दि.१० – शहरात राज्यसरकारचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जळगाव शहरातील विविध प्रभागात विकास कामे सुरू आहेत.
विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने प्रभाग क्र.१२ मधील शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते अनंत जोशी व नगरसेवक नितीन बरडे यांनी वार्डात विविध ठिकाणी फ्लेक्सचे बॅनर लावले होते. दरम्यान काही अज्ञातांनी बॅनर्स फाडून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. यामुळे समाजातील विविध राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता दिसून येते. असा गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी युवासेना जळगाव महानगरतर्फे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्याला विकास हवा आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद तसेच वर्षभरात महानगरपालिकेची निवडणूक आहे. या सर्व निवडणूकींच्या तोंडावर असे प्रकार ठरवून केल्याचे दिसून येत आहे. अशा समाजकंटकांवर त्वरीत कारवाई झाल्यास भविष्यात इतर गैरप्रकार करणाऱ्यांवर वचक बसविण्यास मदत मिळेल.
यावेळी युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर युवाधिकारी गिरीष सपकाळे, यश सपकाळे, महानगर समन्वयक संकेत कापसे, विभाग प्रमुख तेजस दुसाने, अमोल मोरे, युवती उपशहर युवाधिकारी वैष्णवी खैरनार, युवासैनिक अमित जगताप आदी उपस्थित होते.