जळगाव, प्रतिनिधी : एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या रुशान अफराज सैयद (वय २०, मूळ रा. टाकळी बुद्रुक, जि. अमरावती) या विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुशान सैयद हा जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून वसतिगृहात राहत होता. १६ नोव्हेंबर रोजी रात्री त्याला उलटी झाली होती. प्रकृती ठीक नसल्याने सकाळी महाविद्यालयात येणार नसल्याचे त्याने मित्रांना सांगितले होते. त्यामुळे सकाळी त्याचे मित्र महाविद्यालयात निघून गेले.

महाविद्यालयातून परतल्यानंतर मित्रांना रुशान बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत.









