जळगाव, दि. 30 – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधीतीर्थ येथे प्रार्थना सभेतून महात्मा गांधीजींना भावांजली अर्पण करण्यात आली. गांधीतीर्थच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या प्रार्थना सभेच्या सुरवातीला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गीता धरमपाल, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एन. कुलकर्णी यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत आणि शांती मंत्राद्वारे गांधीजींचे स्मरण करण्यात आले. अनुभूती निवासी शाळेतील निखील क्षिरसागर व भूषण गुरव यांनी महात्मा गांधीजींना प्रिय असलेली ‘राम का गुनगान…,’ ‘वैष्णव जन तो तेने कहिऐ…’ ही भजनं सादर केली; यासह ‘तु बुद्धी दे तु तेज दे नव चेतना विश्वास दे…’ या भक्तिभजनांनी मानव कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. ‘रघुपती राघव राजाराम…’ ने प्रार्थना सभेची सांगता झाली. प्रार्थनासभेमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनसह, जैन इरिगेशनमधील सहकारी उपस्थित होते.
अशोकभाऊ जैन यांच्याहस्ते कलावंत निखील क्षिरसागर, भूषण गुरव यांचा सुतीमाला व गांधी दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला. नितीन चोपडा यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन केले. कोरोनामुळे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जाहिर कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसल्याने विशेष निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भावांजली कार्यक्रमामध्ये करोना नियमांचे पालन करण्यात आले.
प्रार्थना सभेच्या कार्यक्रमाचे गांधीतीर्थच्या फेसबुक पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live_videos/ वर या कार्यक्रमाचे प्रसारण पाहता येईल.