जळगाव | प्रतिनिधी

शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करून देण्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (२१ सप्टेंबर) ताब्यात घेतले. महसूल सहाय्यक प्रवीण सुपाडू गांगुर्डे (वय ४१) आणि खासगी इसम योगेश रामलाल वखरे (वय ४२, रा. जामनेर) अशी संशयितांची नावे आहेत.

तक्रारदाराचे जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेत असून, शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मिळावा, यासाठी त्यांनी २०२२ मध्ये तहसील कार्यालयात वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर तहसीलदारांसमोर वेळोवेळी सुनावणी झाली असून, अंतिम निकालासाठी हे प्रकरण प्रलंबित आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारदाराने तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण गांगुर्डे यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी खासगी इसम योगेश वखरे याने प्रवीण गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
त्यानंतर सोमवारी जामनेर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे योगेश वखरे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम त्याने प्रवीण गांगुर्डे यांच्याकडे दिली. गांगुर्डे यांनी रक्कम स्वीकारून ती पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले.
पथकात पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि प्रदीप पोळ यांचा समावेश होता. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी भारत तांगडे, प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.









