जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

आयुक्त व महापौरांना घेराव घालत दिले निवेदन; प्रश्न न सुटल्यास १५ दिवसांत मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा

प्रतिनिधी / जळगाव :

जळगाव शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने गुरुवारी (२० ऑगस्ट) महापालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन तास ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यानंतर आयुक्त व महापौरांना घेराव घालत विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
पाणीपुरवठा आणि वॉटर मीटरच्या निर्णयावरून संताप
शहरातील अनेक भागांत नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता महिन्यातून दोन-तीन वेळा पाणीपुरवठा पुढे ढकलला जात आहे. पाणीपुरवठाच सुरळीत नसताना महापालिकेकडून वॉटर मीटर बसवून पाणीपट्टी वसुलीची तयारी सुरू असल्याचा आरोप पक्षाने केला. २४ तास सुरळीत पाणी देण्याची क्षमता तपासल्यानंतरच वॉटर मीटरचा निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण; बंद पथदिवे आणि स्वच्छतेचा फज्जा
पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मंजुरी मिळूनही काम न करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई करून तातडीने दुसऱ्या मक्तेदारांमार्फत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरातील बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि अजिंठा चौफुली ते विमानतळ परिसरातील रखडलेले सौर पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी झाली. शहरात कचऱ्याचे ढीग साचल्याने डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला असून निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मोकाट कुत्रे, शिवाजीनगर पुलाची दुरुस्ती अन् मेहरुण स्मशानभूमीचा प्रश्न
शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करत पक्षाने शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी केली. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला पुलावरील लोखंडी जिना तातडीने उभारण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. याशिवाय मेहरुण शिवारातील उद्यान परिसरातील स्मशानभूमीत मूलभूत सुविधा पुरवण्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
१५ दिवसांचा ‘अल्टीमेटम’; अन्यथा कुलूप ठोकणार
शहरातील नागरी समस्या येत्या १५ दिवसांच्या आत सोडवण्यात न आल्यास महापालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी प्रशासनाला दिला.
या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सुनील भैय्या माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.








