जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सुवर्ण बाजारात व्यवहाराच्या नावाखाली तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची अवाक करणारी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सुवर्ण कारागिराचा विश्वास संपादन करून तब्बल पावणे दोन किलो सोन्याचे दागिने घेऊन दोन भामटे पसार झाले आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे सुवर्णनगरीसह शहरभरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ परिसरातील सोन्याचे कारागीर नबाकुमार गोरहरी धारा यांच्याशी संशयित आरोपी विद्युत निरोध बाग आणि राजू बिपीन चौधरी यांनी व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले होते. ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत आरोपींनी धारा यांच्याकडून तब्बल १७५५.३४० ग्रॅम (सुमारे पावणे दोन किलो) २२ कॅरेट सोन्याचे दागिने वेळोवेळी टप्प्याटप्प्याने ताब्यात घेतले.

या दागिन्यांच्या मोबदल्यात धारा यांना २४ कॅरेट सोन्याची शुद्ध लगड किंवा रोख रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र, कालावधी उलटूनही आरोपींनी ना सोन्याची लगड दिली ना रोख रक्कम परत केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नबाकुमार धारा यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली.

शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या फसवणुकीचे मुख्य धागेदोरे पश्चिम बंगालशी जोडले गेल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून विशेष पथकामार्फत आरोपींचा शोध सुरू आहे.









