जळगाव, (प्रतिनिधी) : अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली असून, चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका धडक कारवाईत ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याकडून कार, मोटारसायकल आणि मोबाईलसह एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५३ वाजेच्या सुमारास लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी संशयित वाहनाची झडती घेतली असता, कारमध्ये बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, दोघं रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७७ हजार ९०० रुपये किमतीचा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा, ३ लाख रुपये किमतीची हुंडाई सॅन्ट्रो कार, ९० हजार रुपयांची पल्सर मोटारसायकल आणि ४१ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६,०८,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांची ही कठोर कारवाई यापुढेही अशीच प्रभावीपणे सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.









