जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात नुकताच पार पडला. या सोहळ्यात इयत्ता दहावी, बारावी व इतर विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या तब्बल ११० गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता प्रमोद चिंधू लाड, सेवानिवृत्त असिस्टंट रवींद्र पोळ, बऱ्हाणपूर येथील डॉ. विजय गरकल, डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था व समस्त वंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, नशिराबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, नगरसेविका निकिता लाडवंजारी, जामनेर येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे देवानंद वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी मोलाचे विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुरेश वराडे यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “आपल्या समाजातून शंभर तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी घडले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवावे.”

सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमधून इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी व खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व प्रणाली नाईक यांनी केले.
समारोपप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक आणि डिजिटल युगाची कास धरत यंदा छापील पत्रिकांऐवजी व्हॉट्सॲपद्वारे डिजिटल निमंत्रण पाठवण्यात आले होते, ज्यास समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, सचिव महादू सोनवणे, सहसचिव उमेश वाघ, भानुदास नाईक, चंदुलाल सानप, नंदू वंजारी, रामेश्वर पाटील, विजय लाडवंजारी, संतोष घुगे, उमेश आंधळे, सुधीर नाईक यांच्यासह भगवान सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. गुणवत्तेचा गौरव करणारा हा सोहळा सर्वांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला.









