जळगाव, दि.11 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार जळगावात खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृहात करण्यात आलं होतं. सदर स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन प्रतिष्ठानाने केले होते. सुमारे ४५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह शशांक दंडे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
परीक्षक म्हणून जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पेंटिंग ची आवड लावून शिकवणारे तरुण भाटे, भारत विकास परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या क्षेत्रीय सचिव तसेच सहकार भारती च्या राष्ट्रीय सदस्य सुजाता खटावकर देवगिरी प्रांत भू-अलंकरण (रांगोळी) प्रमुख गीता रावतळे, जळगावच्या रांगोळी कलाकार कुमुद नारखेडे, फोटोग्राफर, वारली पैंटिंग व पोर्ट्रेट बनविणारे समीर दीक्षित, यांनी केले. राष्ट्रीय स्तरावर निवड होणाऱ्या कलावंतांना सुमारे ६ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कोविड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हात धुवून, सॅनिटाईज करुन, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक केले होते. या स्पर्धेमध्ये स्थानिक स्तरावर स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठाना तर्फे प्रथम द्वितीय व तृतीय असे रु. १५००/-, रु. १०००/- व रु. ५००/- ची पारितोषिके बालगंधर्व संगीत महोत्सवात समारोपाच्या दिवशी वितरित केली गेली. सुमारे ४५ स्पर्धकांमधून प्रथम पारितोषिक माधुरी हितेश बारी यांना, द्वितीय पारितोषिक लेखश्री चंद्रकांत जगदाळे यांना तर तृतीय पारितोषिक रत्नप्रभा अविनाश येवले यांना मिळाले.
स्पर्धकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, रांगोळीचा फोटो, रांगोळी सोबतचा सेल्फि व इतर तांत्रिक कामे निनाद चांदोरकर व डॉ. चांदोरकर यांच्यासोबत वरूण नेवे व प्रसन्न भुरे यांनी केली.