जळगाव, दि. 12 – ‘आपल्याकडील ज्ञान दिल्याने वाढते, त्या ज्ञानाच्या सहाय्याने आपली प्रगती होतेच परंतु ज्यांना आपण ज्ञान देतो त्यांची देखील प्रगती होते. जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम (DAESI) हा खूप उपयुक्त ठरेल.’ असा विश्वास तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे प्रिंन्सीपल सायंटीस्ट डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्याहस्ते जैन हिल्स येथे कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रमाची सुरवात नुकतीच झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.
त्यावेळी व्यासपीठावर आत्माचे संचालक मधुकरराव चौधरी, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक डॉ. आश्विन झाला, गीता धरमपाल, कृषि विभाग माजी उपसंचालक पी.के. पाटील, माजी बाजरी पैदासकार डॉ. एच.टी. पाटील, उपसंचालक कुरबान तडवी, कृषिविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किरण मांडवडे, वाकोद येथील गौराई कृषितंत्र निकेतनचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, एच.एस. महाजन (DAESI फॅसिलिटेटर), गौराई कृषितंत्र निकेतनचे ए.एम. पाटील (फॅसिलिटेटर), यांची उपस्थिती होती.
जैन हिल्स येथे कृषि आणि कृषिसंबंधीत एक वर्षीय डिप्लोमा कार्यक्रमात आरंभ झाला. वर्षभर चालणाऱ्या डिप्लोमासाठी जिल्ह्यातील सुमारे 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. आठवड्याला एक दिवस असे 50 आठवड्यांचा हा कालावधी असेल. भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन, गांधीतीर्थ, या संस्थांच्या संयुक्तविद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
डॉ. आश्विन झाला यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी खेड्याकडे चला या महात्मा गांधीजींच्या विचारानुसार ग्रामविकासाच्या दृष्टीने कृतिशील प्रयोग केले, महात्मा गांधीजीं व कस्तुरबा यांच्या 150 जयंतीच्या औचित्याने भारतातील दत्तक घेतलेल्या 150 गावांच्या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
जैन इरिगेशन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल ढाके यांनी जैन हिल्सची निर्मिती कशी झाली तसेच कृषि क्षेत्रातील उच्च कृषितंत्रज्ञान व शेतकऱ्यांची प्रगती याबाबत माहिती दिली. जैन इरिगेशनच्या कृषि उच्चतंत्रज्ञानामुळे शेती, शेतकरी यांची प्रगती झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. उपसंचालक कुरबान तडवी यांनी पदविका अभ्यासक्रमाबाबत संपूर्ण वर्षात घेतल्या जाणाऱ्या तासिका, प्रात्यक्षिके याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘मी कृषिकेंद्राचा संचालक आहे, मला सर्व माहिती आहे या भ्रमात न राहता आपण डिप्लोमाचे विद्यार्थी आहोत व आपल्याला शिकायचे आहे, येथील शिस्त पाळावी व जमले तर ड्रेसकोड देखील ठरवा..’ याबाबत आत्माचे संचालक मधुकर चौधरी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी गीता धरमपाल, यांनी देखील सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौराई कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी यांनी केले. या उपक्रमासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, व्ही.के. बोरोले तसेच फॅसिलिटेटर एच.एस. महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.