जळगाव, (प्रतिनिधी) : गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव कृउबा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जोशीपेठेतील ‘ओम ज्वेलर्स’चे संचालक कृष्णा भगवान शिंदे यांची महिनाभरापूर्वी ओम महाजन याच्याशी ओळख झाली होती. ४ जून रोजी ओमने शिंदे यांना फोन करून, बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्यावर १९ लाखांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. हे लोन फेडून दागिने मोडायचे आहेत, असे सांगत त्याने तत्कालीन बँक व्यवस्थापकाचे नाव घेऊन शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ५ जून रोजी ओमने दुकानात येत तातडीने १९ लाख रुपयांची मागणी केली. शिंदे यांनी तात्पुरती व्यवस्था करून ६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले.
रक्कम खात्यात वर्ग झाल्यानंतर ओमने तांत्रिक अडचणी, केवायसी नसणे आणि खाते सीझ झाल्याची कारणे पुढे करत वेळकाढूपणा सुरू केला. त्यानंतर त्याने ८ जून रोजी शिंदे यांच्या खात्यात केवळ ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले; मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी ओमच्या वडिलांची भेट घेतली, मात्र तिथूनही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, ओम महाजन याने सराफ बाजारातील इतर ३ ते ४ व्यावसायिकांचीही अशाच प्रकारे लाखोंची फसवणूक केल्याची चर्चा असून, या गुन्ह्यामुळे जळगावात खळबळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







